तीन संशयितांची रेखाचित्रे जारी   

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ पर्यटकांचे प्राण घेणार्‍या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जारी केली. असिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या संशयितांची नावे आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.मूसा, युनूस आणि आसिफ अशी त्यांची सांकेतिक नावे होती. या तिघांचाही पूंछमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. 
 
पहलगामच्या बैसरण खोर्‍यात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांच्या मदतीने ही रेखाचित्रे तयार करण्यात आली. रेखाचित्रावरुन दहशतवादी तरुण दिसतात. तसेच, त्यांनी दाढी वाढवल्याचे दिसते. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘रेझिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.हल्लेखोर नेमके किती होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, हल्लेखोरांची नेमकी संख्या लवकरच स्पष्ट होईल, असे सांगितले जाते.हल्लेखोरांकडे एके-४७ आणि एम-४ सारखी अत्याधुनिक शस्त्रे होती. दहशतवाद्यांनी डोक्यावर आणि कमरेवर कॅमेरा लावला होता. त्यांनी लष्करी गणवेश परिधान केला होता, असेही स्पष्ट झाले आहे.
 
हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी घटनास्थळापासून काही अंतरावर सापडली आहे. ही दुचाकी बिना नंबरप्लेटची होती. त्यामुळे, दुचाकी नेमकी कोणाची आहे, याचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांमध्ये दोन स्थानिक आणि दोन परदेशी असल्याचे सांगितले जाते. परदेशी दहशतवाद्यांची भाषा पाकिस्तानी होती. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याप्रमाणेच पहलगाम हल्ल्याची तयारी दहशतवाद्यांनी केली होती. दहशतवाद्यांच्या पाठीवर बॅग होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्याकडे औषधे, ड्रायफ्रूट आणि संपर्कासाठी काही उपकरणे असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

जंगलात शोध सुरु

पर्यटकांवर बेछूट केल्यानंतर हल्लेखोर जंगलात पळून गेले. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. जंगलात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि श्वान पथकांचीदेखील मदत घेतली जात आहे.

हल्ल्याआधी केली होती रेकी

पहलगाम हल्ल्याआधी दहशतवाद्यांनी रेकी केली होती, असे समोर आले आहे. १ ते ७ एप्रिल दरम्यान दहशतवाद्यंनी विविध हॉटेलची आणि पर्यटनस्थळांची पाहणी केली होती. महिनाभरापासून दहशतवादी पहलगाम परिसरात होते. या काळात ते जंगलात वास्तव्यास होते, असेही समोर आले आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय इतका मोठा हल्ला अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हल्लेखोरांना कोणी-कोणी मदत केली, याचा तपास सुरू आहे. 
 

Related Articles